Peoples Media Pune header

Go Back

*संविधानाच्या रक्षकांच्या रक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध : डॉ. नीलम गोऱ्हे*

23 Sep 2022

मुंबई, ता. २२ : भारतात गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने मनासारखे राजकीय निर्णय घेण्याची सुरुवात केली आहे. यामध्ये काही वेळा अमुक एका राज्याच्याच विकासाचा विचार होऊन त्याप्रमाणे निर्णय घेण्याची घाई होत आहे. अशावेळी संविधान बचावो अभियानासारख्या समाजहिताच्या चळवळी या स्वागतार्ह आहेत. कोणतेही राजकीय हेतू समोर न ठेवता केवळ समाजाच्या आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सुरु झालेल्या या अभियानाचे मी स्वागत करते. भारतीय संविधानाच्या रक्षकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीमागे शिवसेना कायमच खंबीरपणे उभी असेल असे प्रतिपादन आज शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. विविध समाजवादी संघटना, राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या ' नफरत छोडो - संविधान बचाओ' मोहिमेच्या बांद्रा, मुंबईतील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, तुषार गांधी, सुभाष लोमटे, फिरोझ मिठीबोरवाला, एस. एल. गुड्डी, विशाल हिवाळे, योगेंद्र यादव, अतुल लोंढे, आली भोजानी यांच्यासह विविध राज्यातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. सत्ता, संपत्ती अशा गोष्टींकडे लक्ष देणाऱ्या लोकांनी संविधानाची मुल्ये जपली पाहिजेत. आजवर शिवसेनेने नाणार रिफायनरी, लवासा, स्वामिनाथन समितीच्या अहवाल अशा कितीतरी समाज हिताच्या गोष्टींवर पाठिंबा दिला आहे. महिलांवर देशभरात अत्याचार होत आहेत. मात्र गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण मात्र कमीच आहे. समाजमाध्यमे आणि एकूणच समाजात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही म्हणावा तेवढा विकसित झालेला नाही. त्यामुळे आपल्या देशात अजून काम करायला हवे अशा सकारात्मक गोष्टी बऱ्याच आहेत. यासंदर्भात पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यापुढे संबंधित विचार मांडून पुढील कार्यक्रम ठरवला जाईल असेही मा. नीलमताईंनी सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite