Peoples Media Pune header

Go Back

पुणेकर खवैय्यांना 'भारी भरारी'ची मेजवानी मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय 'फन फूड फेस्टिवल' 

29 Dec 2017
पुणेकर खवैय्यांना 'भारी भरारी'ची मेजवानी मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय 'फन फूड फेस्टिवल'  पुणे : मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणे, कऱ्हाडे ब्राम्हण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारी भरारी'ची पुणेकर खवैय्यांना मेजवानी मिळणार आहे. दि. ५, ६ व ७ जानेवारीला शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे या फन फूड शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, दि. ५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मित्रमंडळाचे खजिनदार सुमुख आगाशे, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, अभिजित देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संजय जोशी म्हणाले, "या फन फूड शॉपिंग फेस्टिवलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून चवदार अश्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहान मुलांसाठी असंख्य खेळ, तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू देखील असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य यात्रेबरोबरच ग्राहकांना धम्माल गेम्स आणि शॉपिंगचा देखील मनसोक्त आनंद ग्राहकांना घेता येईल. या फेस्टिवल मध्ये लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन होईल त्यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि लहान मुलांना नेहमी प्रिय असणाऱ्या धम्माल गेम्स याठिकाणी असणार आहेत. जवळपास २०० च्या वर स्टॉल्स यामध्ये असणार आहेत." कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, मोदके, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. हे फूड फेस्टिवल ५, ६ व ७ जानेवारी या दिवशी संपूर्ण दिवसभर ग्राहकांसाठी खुले असणार आहे. हातमागावर पैठणी विणण्याचा अनुभवही ग्राहकांना घेता येणार आहे. शिवाय, जुन्या यज्ञपात्रांचे प्रदर्शनही यावेळी पाहता येईल. शनिवारी संध्याकाळी चंद्रशेखर महामुनी यांच्या सुमधुर संगीताचा कार्यक्रम देखील रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शारंगधर फार्मातर्फे फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. श्रीपाद करमरकर, सुधीर गाडगीळ, सूर्यकांत पाठक यांच्यासह इतर समविचारी लोकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळ नवनवीन उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचा मित्रमंडळाच्या उद्देश आहे. १९९० मध्ये सुरु केलेल्या या मंडळाला २५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.  यंदाच्या २६व्या वार्षिक संमेलनानिमित्त परप्रांतातील दोन मराठी उद्योगपतींच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.हुबळी कर्नाटक येथील विभवा इंडस्ट्रीजचे (मंकी ब्रँड झाडू व ओझोन फिनाईल) संचालक अच्युत लिमये आणि कोलकाता येथील लेदर बॅग्स उत्पादक ट्रायो ट्रेंड एक्स्पोर्टचे संचालक मुकुंद कुलकर्णी या दोन मराठी उद्योजकांची मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत. तसेच पाच तरुण उद्योजकांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे, असे संजय जोशी यांनी सांगितले. ------------------------ फोटो : पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून सूर्यकांत पाठक, संजय जोशी व माधव गोडबोले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite