Peoples Media Pune header

Go Back

नातू पुरस्कार जाहीर : डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे व चैत्राम पवार मानकरी

पुणे 05 Jan 2012 प्रेस नोट

 

पुणे :  ग्रामीण विकासाच्या  व सामाजिक सेवेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या  ‘महादेव बळवंत नातू’ या पुरस्कारासाठी यंदा मेळघाटातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे  यांची तर धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येतील  वनवासी कार्यकर्ते चैत्राम पवार यांची ‘सेवाव्रती कार्यकर्ता ‘ या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे.
डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे यांना देण्यात येणा-या नातू पुरस्काराचे रुपये १ लक्ष, शाल व स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रामुख्याने  ग्रामीण भागात  किमान पंधरा  वर्षे प्रत्यक्ष राहून काम करणा-या ध्येयवादी कार्यकर्त्याला दरवर्षी देण्यात येतो. डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे हे गेली वीस वर्षांहून अधिक काळ  मेळघाटात राहात असून वैद्यकीय सेवेचे व आरोग्यविषयक  जनजागृतीचे काम करीत आहेत. मेळघाटातील कुपोषणाच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधण्यात  डॉ. कोल्हे पती पत्नींचे योगदान मोठे  आहे.  डॉ. रवी कोल्हे हे  सध्या  मेळघाटात शेतीविषयक प्रयोगही करीत आहेत.
तसेच ध्येयवादी वृत्तीने किमान पाच वर्षे  पुर्णवेळ सामाजिक काम करणा-या कार्यकर्त्यास ‘सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार’ नातू ट्रस्ट तर्फे दरवर्षी देण्यात येतो. पंचवीस हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी  धुळे  जिल्ह्यातील बारीपाडा या आदिवासी गावात सामूहिक वन संरक्षणाचे काम करणाऱ्या  श्री. चैत्राम पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. जनसेवा फौंडेशनच्या मदतीने त्यांनी या गावात  चारसूत्री भातशेतीस सुरवात केली. सध्या ते वनवासी कल्याण आश्रम(महाराष्ट्र)चे उपाध्यक्षही आहेत.
नातू ट्रस्टतर्फे यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे सन्मती बालनिकेतन,पुणे (रु. १ लक्ष), वनवासी कल्याण आश्रम (रु. १ लक्ष), समोतल फौंडेशन, मुंबई, साने गुरुजी रुग्णाल, किनवट, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे , ज्ञान संवर्धिनी, शिरवळ, माँ शंखेनी महिला उत्थान केंद्र, बस्तर ( प्रत्येकी रु.२५ हजार),  छात्र प्रबोधन,पुणे  व रामकृष्ण आश्रम, औरंगाबाद (प्रत्येकी रु.२० हजार), संत सेवा संघ व वेद विज्ञान आश्रम, बार्शी (प्रत्येकी रु. १०  हजार) या संस्थांना समारंभपूर्वक देणगी देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण  सोमवार  दि. ९जानेवारी  रोजी महादेव बळवंत तथा भाऊसाहेब नातू यांच्या पंचविसाव्या स्मृतीदिनानिमत्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  सिंधुताई सपकाळ  यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान  सोहळा सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनमध्ये  सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती नातू ट्रस्टचे  प्रमुख विश्वस्त श्री.दत्ता टोळ व चंद्रशेखर यार्दी यांनी दिली.
 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite